चैत्र

गुढीपाडवा
                      
हिंदू संस्कृती मध्ये हि वेगवेगळे वर्षारंभ आहेत परंतु सर्वसाधारण सर्वमान्य असा चैत्र शुक्ल प्रतिपदेला वर्षारंभ साजरा करण्याची आपली परंपरा आहे. ख्रिस्ताब्द १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून, गतिक स्तरावर परंपरा,स्थळ कालानुरूप वर्षारंभ वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जातात, तसेच विक्रम संवत कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून,शालिवाहन शक चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून, पारसी फरवर्दिन पासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष व सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. यांत सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एका कुंभाराच्या पोटी जन्म घेतलेला महाराष्ट्रीय होता. शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेची मुक्तता केली. पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळेशालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. यादिवशी संवत्सर प्रारंभ होत असते, संवत्सर म्हणजे साठ वर्षाचे कालचक्र यातील प्रत्येक वर्षाला स्वतःचे असे एक नाव असते जसे नंदन , विजय इ.  साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने काही विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते.
चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक कारणे आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) व वसंत ऋतू सुरू होतो. "ऋतुनां अहं कुसुमाकर"वसंत ऋतू ही माझी विभूती आहे, असे भगवंतांनी श्रीमद्‌भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस. अभ्यंगस्नान करणे, दाराला तोरणे लावणे व पूजा यांबरोबरच घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो
                   
गुढी उभारण्याचा विधी 
यापूर्वी अभ्यंगस्नान मुखमार्जन उरकून दारावर पानाफुलांची तोरणे लावावीत. गुढी उभी करण्याच्या वेळूच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे.वेळूच्या काठीच्या निमुळत्याटोकाला नवे कोरेरेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि गाठी ( साखरेची माळ ) बांधून त्यावर धातूचे भांडे/तांब्या बसवले जाते. गुढी नंतर पाटावर उभी केली जाते. गुढी हे स्वागताचे प्रतीक आहे.नंतर पूजा-अर्चा करून गुढी उभारावी. ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि गूळ कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खावी.तसेच वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करावे. गुरूं, वडीलधा-यांना वंदन करावे, त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे, अशी धर्माज्ञा आहे. संवत्सर फल म्हणजे काय ? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असेल त्या वर्षाच्या कालावधीमध्ये असणा-या स्थितीवरून - जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी आहे याचे वर्णन संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. पंचपक्वान्नाचे भोजन करून तो दिवस आनंदात घालवावा. या दिवशी चांगल्या कामाचा शुभारंभ करावा. 
सायंकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात. त्यापूर्वी तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात (पुन्हा धने उन्हाळ्यात उपयोगी तर उन्हातून आल्यावर पाणी देण्यापूर्वी गुळाचा खडा देण्याची प्रथा आहे) व त्यावरची साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात (होळी पासूनच हार-कडे देवाणघेवाण सुरू होते)
पौराणिक संदर्भ 
ब्रह्मादेवाने हे जग चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले असे पुराणात सांगितलेले आहे. त्यामुळे विश्वाचा वाढदिवस या गुढीपाडव्याला साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो.
चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला १४ वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, प्रभू राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगरजनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या. आपली घरेदारे सजवली सोन्यामोत्यांनी व हिरेमाणकांसारख्या वैभवसंपन्न रत्नांनी पूर्ण अयोध्या सजली होती अशी वर्णने वाचायला मिळतात.त्या आनंदाचे प्रतीक म्हणून आपणही घरादाराला आंब्याची तोरणे बांधतो, फुलांच्या माळांनी घर सजवतो.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रात:काळी सूर्योदवसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला. स्वर्गातील अमरेंद्राने  चैत्र शुक्ल प्रतिपदेला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो.आजकाल काही संघटना गुढीपाडवा या सणाचा संभाजीराजेंच्या मृत्यू संदर्भांमध्ये जोडतात परंतु दोन्हीचा काडीमात्र संबंध नाही आणि गुढी उभारणे हे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी उभा केलेला धर्मध्वज आहे आणि हा उत्सव आनंदात साजरा व्हायला हवा.
वैज्ञानिक संकल्पना 
कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ करतात. कारण उन्हाळ्यात होणार्‍या त्वचारोगापासून बचाव करण्याचे सामर्थ्यही ह्यात आहे.मुलांनाही इळवणी घालतात. म्हणजे उन्हात पाणी ठेवून त्या पाण्याने मुलांना अंघोळी घालतात याचाच अर्थ लहानथोरांच्या जीवन शैलीत बदलत्या ऋतुमानानुसार बदल करून निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचाच मार्ग या परंपरेत आहे. वर्षाच्या सुरवातीला मागच्या सगळ्या कडू गोष्टी गिळून टाकून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरू करा असे ही प्रथा सांगत आहे.
श्रीक्षेत्र जेजुरी ऑगस्ट १९९१ मध्ये अघटीत घटना घडली मंदिरातील देवाच्या मूर्तींची चोरी झाली परंतु एक महिन्याच्या अवधी मध्ये दिनांक १२ सप्टेंबर १९९१ रोजी मूर्ती सापडल्यानंतर उत्स्फुर्तपणे मूर्तींच्या स्वागतासाठी नागरिकांनी गुढ्याउभारल्या होत्या यादिवशी जेजुरीकर नागरिकांनी वर्षातील सारे सण साजरे होत असल्याचा अनुभव घेतला होता.

श्रीरामनवमी उत्सव

श्रीरामनवमी अर्थात चैत्र शुद्ध नवमी, श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी संपूर्ण भारत वर्षामध्ये साजरी होत असते.  या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत श्रीरामचंद्रांचा जन्म झाला.देवता व अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. श्रीराम नवमीला श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. श्रीराम नवमीला `श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप, तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.
श्रीरामनवमी उत्सव 
श्रीराम मंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन व राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळीश्रीरामाची मूर्ती किंवा कुंची घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात व भक्‍तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात. याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा (रामजन्माचे गीत) म्हटला जातो.’ त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात व प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही देतात. या दिवशी श्रीरामाचे व्रतही करतात. हे व्रत केल्याने सर्व व्रते केल्याचे फळ मिळते, तसेच सर्व पापांचे क्षालन होऊन अंती उत्तम लोकाची प्राप्‍ती होते, असे सांगितले आहे. 
चैत्र शुद्ध नवमी हा चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस रामाचा जन्म झाला.हा दिवस रामनवमी म्हणुन साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी १२.०० वाजता रामजन्माचा सोहळा होतो.रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारासमवेतच गाठी पण घालतात.रामजन्म झाल्यावर फटाके फोडतात.त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात.
भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता. विशेष म्हणजे, महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती.
श्रीरामनवमी व्रत
चैत्र शुक्ल अष्टमीला सकाळी लवकर स्नान आटोपून श्रीरामाचे नामस्मरण करावे.
चैत्र शुक्ल नवमीला ब्रह्म मुहर्तात ऊठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत.
त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे.
‘उपोष्य नवमी त्व यामेष्वष्टसु राघव| तेन प्रीतो भव त्वं भो संसारात् त्राहि मां हरे||’ या मंत्राने ईश्वराप्रती व्रत भावना प्रकट करावी.
त्यानंतर, ‘मम भगवत्प्रीतिकामनया (वामुकफलप्राप्तिकामनया) रामजयंतीव्रतमहं करिष्ये’ हा संकल्प करून काम- क्रोध-लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे.
मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे.
घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात सर्वतोभद्रमंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलश स्थापन करावा.
कलशावर रामपंचायतन (त्यामध्ये राम-सीता, दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न, लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी.  त्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण पूजा
 करावी.
रामनवमीच्या दिवशी संपूर्ण आठ प्रहर उपवास ठेवला पाहिजे.
दिवसभर ईश्वराचे भजन-स्मरण, स्तोत्र-पाठ, हवन आणि उत्सव साजरा करावा.श्रीराम कथा वाचन करावी.
या दिवशी मर्यादा पुरूषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा.
प्रभु श्रीरामचंद्र चरित्र-श्रवण करून जागरण करा.
दुसर्‍या दिवशी (दशमीला) पारायण करून व्रत सोडावे.
गरीबांना दान करून त्यांना जेवू घालावे.
रामनवमी व्रताचे फळ
हे व्रत नित्य, नैमित्तिक आणि काम्य अशा तीन प्रकारचे आहे. नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्‍यभर केले तर आयुष्य आनंदमय होते.
एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे यथेच्छ फळ मिळते.
विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते.