भाद्रपद



हरतालिका पूजा

आपल्या भारतीय संस्कृतीत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी विशेष सण आहेत. त्यातीलच हरतालिका हा सण खास करून कुमारिकांसाठी आहे. सौभाग्यप्राप्ती करावयाचे हे एक व्रत आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. हे व्रत सुवासिनीदेखील करू शकतात.हरतालिकेला नदी वा समुद्रातून वाळू आणून मैत्रीण, पार्वती वं तीन शिवलिंगाची प्रतिमा स्थापन करून त्याची पूजा करतात. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. फलाहार करतात. रात्री कथाकथन, जागरण करून सकाळी उत्तरपूजा करतात. देवीला खिचडीचा नैवद्य दाखवून देवीचे विसर्जन करतात.
हे व्रत भक्तीभावाने, निष्ठेने केल्यास मुलींना आपल्या मनाजोगा वर, अखंड सौभाग्य, आरोग्य, संतती वं संपत्तीचा लाभ होतो.

हरतालिका हे पार्वतीचे नाव आहे. पार्वतीने प्रबळ इच्छाशक्तीने तपश्चर्येने आपल्या मनाजोगता पती मिळविला. हे करताना तिला “आली” नावाच्या मैत्रिणीने मदत केली. आलीच्या मदतीने हर पती मिळाला म्हणून पार्वतीचे नाव हरतालिका पडले.ह्या व्रताची कथा मुलीसाठी प्रेरणादायक आहे. हिमाचल पर्वताची मुलगी गौरी ही पर्वताची कन्या म्हणून पार्वतीदेखील म्हणतात. हिला भगवान विष्णूचे मागणे घेऊन नारदमुनी हिमालयाकडे आले. ह्या सुवार्तेने हिमालयाला अतिशय आनंद झाला त्याने पार्वतीला ही गोड बातमी सांगितली पण पार्वती तर खूप आधी पासून भोळे सांब म्हणजेच श्रीशंकराला वरून बसली होती. मनातल्या मनात तीने सदाशिवालाच आपला पती मानले होते.


पित्याने विष्णूशी लग्न ठरविल्यामुळे ती आपली मैत्रीण आली हिला घेऊन अरण्यात निघून गेली. तिथे तीने कठोर तपश्चर्या व शिवाच्या अखंड चिंतनाने, उपासनेने शंकराला प्रसन्न केले. व आपला पती होण्याची कृपा करावी असा वर मागितला. शंकराने तथास्तु म्हटले.बातमी कळताच हिमालयाने भगवान शंकराला आमंत्रण देऊन शिव पार्वतीचा मंगल विवाह सोहळा घडवून आणला. अशा तऱ्हेने पार्वतीने आत्यंतिक प्रेमाने, निष्ठेने शंकराला मिळविले म्हणून लोक शंकराला ‘पार्वतीपतये’ असे म्हणू लागले. पार्वतीने शंकराच्या गुणांवर प्रेम केले. शंकर भोला होता पण कलागुणी, कर्तबगार, तपस्वी,शक्तीमान, दयाळू होता.
हल्लीच्या मुलींनी वं त्यांच्या पालकांनीदेखील या सणातून शिकण्यासारखे आहे. फक्त संपत्ती, ऐश्वर्य वा दिखाऊपणावर जाऊन लग्नाचा निर्णय घेऊ नये तर मुलाच्या कर्तबगारीवर, गुणांवर, कर्तुत्वावर विश्वास ठेवावा. ऐश्वर्याची खात्री देता येत नाही परंतू सदगुणांची खात्री देता येते. हाच खरा हरतालीकेचा संदेश आहे.


गणेशोत्सव

महाराष्ट्रातील सर्वात मोठा व आगळावेगळा सण म्हणजे गणेशोत्सव. या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक झाल्यापासून तर हा उत्सव महाराष्ट्रभर अत्यंत धामधुमीने साजरा केला जातो. हा उत्सव दहा दिवसांचा असतो. गणपती ही ज्ञानाची देवता. गजानन हा विघ्नहर्ता मानतात. त्यामुळे कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करण्याचा प्रघात आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या दृष्टीने हा सर्वात महत्त्वाचा सण असल्यामुळे जगाच्या पाठीवर असलेला कोणताही मराठी माणूस या उत्सवासाठी आपल्या गावी जाण्यास उत्सुक असतो. 

या सणाला शाडूच्या मातीच्या केलेल्या एकापेक्षा एक सरस अशा गणपतीच्या मूर्ती बाजारात येतात.पर्यावरणाला हानिकारक असणा-या प्लास्टर ऑफ परीस च्या मूर्ती पाण्यामध्ये विरघळत नाहीत त्यामुळे गणरायाची विटंबना होते म्हणून शाडूच्या मातीचीच मूर्ती बघावी. त्यापैकी एक घरी आणावी. गणपती आणावयास जातेवेळी लोक बरोबर ताम्हण, रूमाल घेऊन जातात. गणपती आणतांना झाकून आणतात व गणपतीचे तोंड आपल्याकडे येईल असे पहातात. गणपती आणतेवेळी गणपतीपुढें काही नाणी व गोविंद विडा ठेवून गणपती घरी आणावा अशी पुष्कळ ठिकाणी पध्दत आहे. गणपती घरी आणल्यानंतर घराच्या दाराबाहेर गणपतीला तांदूळ व पाणी यांनी ओवाळून ते बाहेर टाकून देतात. नंतर गणपती आणणा-या व्यक्तिच्या पायावर गरम पाणी घालतात. गणपतीला व गणपती आणणा-या व्यक्तिला कुंकू लावतात, पाच सवाष्णीं गणपतीला औक्षण करतात. पाटावर तांदूळ पसरून त्यावर गणपती ठेवून गणपतीची स्थापना करतात. गणपतीच्या पूजेकरिता नारळ, एकवीस मण्यांचे वस्त्र, फुले-पत्री, शमी, दुर्वा, जानवे, गूळ-खोब-याचा नैवेद्य, केवडयाचे कणीस इ. साहित्य लागते. गणपतीची स्थापना करण्यापूर्वी सुपारीच्या गणपतीची स्थापना करून त्याची पूजा करण्यात येते.गणपती अथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तने करतात. यथासांग पूजा व आरती करून सकाळचा कार्यक्रम संपवितात.
दररोज सकाळी व सायंकाळी पूजा-आरती करून, केळे-पेरू वगैरे खिरापत संध्याकाळी आरतीचे वेळी देतात. गणेशाची आरती म्हणजे बाल गोपालांसाठी आनंदाचे उधान असते, यानिमित्ताने देवतांच्या पाच,सात किंवा आकार आरत्या म्हंटल्या जातात. त्यानंतर प्रार्थना, मंत्रपुष्पांजली होऊन खिरापतीचा प्रसाद सर्वांना वाटला जातो. 
या उत्सवामध्ये मुख्यतः नारळ व गूळ यांच्या सारणाचे, गणरायाला प्रिय असलेले तांदुळाच्या उकडीचे मोदक करतात
सार्वजनिक गणपतींचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात. काही लोकांकडे दीड दिवसांचा गणपती असतो तर काही जणांकडे पाच दिवस असतो. तर काहीजणांचा गणपती गौरींबरोबर सातव्या दिवशी जातो.
गणपती विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी नेहेमीप्रमाणे गणपतीची पूजा करतात. गणपतीच्या हातांत गूळ-खोबरे व तिळाचा लाडू देऊन आरती करातात. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा गजरांत गणपती मूळच्या जागेवरून हलवून ताम्हणात ठेवतात. वरील पूजा सोवळयाने करतात. नंतर गणपतीचे तोंड घरातील दाराकडे करून गणपतीची पाठ आपल्याकडे करून गणपती विहीरीवर, तळयावर, नदीवर, समुद्रावर विसर्जनाकरीता नेतात. झांज घेऊन 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत विसर्जनाच्या ठिकाणापर्यंत जातात. तिथे परत गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला दुर्वा वाहतात, आरती करतात. यास उत्तरपूजा म्हणतात. विसर्जनाच्या वेळी गणपती दोन वेळा पाण्यातून बाहेर काढतात व तिस-या वेळी पाण्यात सोडतात.
नंतर नदीकाठची वाळू किंवा विहीरीजवळचे खडे आणून घरांत चारी बाजूला टाकतात. समज असा आहे की, चारी बाजूला वाळू किंवा खडे टाकले असतां जनावराची भिती नसते. गणपती जवळ टेवलेला नारळ नदीवर, विहीरीवर फोडातात. प्रसाद म्हणून खोबरे वाटतात. घरी आल्यावर सर्वांना प्रसाद व केलेली खिरापत देतात.काही ठिकाणी गणपती विसर्जनाच्यावेळी गणपतीच्या जागी तांब्याचा कलश व त्यावर नारळ ठेवतात. गणपतीच्या विसर्जनानंतर घरी आल्यावर त्या कलशाची नेहेमीप्रमाणे आरती, मंत्रपुष्प म्हणून सांगता करण्याची पध्दत आहे.